पायी वारीत जिभाऊ सातपुते यांनी जपले रक्ताचे नाते* *वारीदरम्यान रक्तदान करून दिला मानवतेचा संदेश*
पायी वारीत जिभाऊ सातपुते यांनी जपले रक्ताचे नाते*
*वारीदरम्यान रक्तदान करून दिला मानवतेचा संदेश*
*नांद्रा, ता. पाचोरा (प्रतिनिधी) – *प्रा. यशवंत पवार*
"हे विश्वचि माझे घर" हा संतांचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून जगणारे नांद्रा येथील युवा शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते जिभाऊ सातपुते यांनी आषाढी पायी वारीदरम्यान रक्तदान करून मानवतेचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
संतांनी दिलेल्या समता, बंधुता आणि सर्वधर्मसमभावाच्या शिकवणीनुसार प्रत्येक व्यक्तीने जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन गरजूंच्या मदतीस धावून जाणे, हाच खरा मानवधर्म आहे. आधुनिक विज्ञानाने मोठी प्रगती केली असली तरी एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी आजही माणसालाच माणसासाठी रक्तदान करावे लागते. रक्ताला धर्म, जात किंवा पंथ नसतो; ते फक्त जीवनदान देत असते.
नांद्रा येथील जिभाऊ सातपुते यांच्या घरी जळगाव ते पंढरपूर जाणाऱ्या ह.भ.प. भागवत महाराज यांच्या दिंडीची अनेक वर्षांची सेवा केली जाते. दरवर्षी या दिंडीत भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था केली जाते. सुरुवातीला सुमारे दीडशे वारकऱ्यांसह निघालेली ही दिंडी प्रवासादरम्यान चारशे ते पाचशे वारकऱ्यांपर्यंत वाढत जाते.
यंदा पंढरपूरपासून सुमारे १०० ते १२० किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात दिंडीचा मुक्काम असताना तेथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सलग अनेक दिवस दररोज २५ ते ३० किलोमीटर पायी चालूनही शारीरिक व मानसिक थकवा न जुमानता जिभाऊ सातपुते यांनी ह.भ.प. भागवत महाराज यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
जीभाऊ सातपुते यांच्या घरी त्यांचे वडील स्व.सुरेशदादा सातपुते यांच्या परमार्थिक सेवेने या कुटुंबाला या विधायक कार्याचा वारसा लाभला असून हे कुटुंब नेहमी धार्मिक व सामाजिक वारसा जपत असते मग ते गावातील महादेव मंदिर संस्थांच्या सप्ताह देणगी देऊन,वस्तू देऊन किंवा महाप्रसादासाठी काही योगदान देऊन ते करत असतात तोच वारसा आज त्यांच्या कुटुंबातील तिन्ही मुलांकडून प्रपंच साधून परमार्थ जपला जात असल्याने त्यांचे परिसरातून सामाजिक व धार्मिक दातृत्व मुळे कौतुक होत आहे
"रक्तदान हेच श्रेष्ठ दान" या भावनेतून केलेल्या या कृतीने वारकरी संप्रदायातील सेवा, समर्पण आणि मानवतेचा संदेश अधिक दृढ केला. वारकरी परंपरेत भक्तीबरोबरच समाजसेवेलाही तितकेच महत्त्व असल्याचे जिभाऊ सातपुते यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
त्यांच्या या प्रेरणादायी उपक्रमामुळे समाजात रक्तदानाबाबत जनजागृती होण्यास मदत होणार असून राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव आणि परोपकाराची भावना अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

No comments