Breaking News

वरखेडी येथील निर्मलाताई अध्यापक विद्यालयाच्या सन २०११-१२ बॅचच्या विद्यार्थी-शिक्षकांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न



 वरखेडी येथील निर्मलाताई अध्यापक विद्यालयाच्या सन २०११-१२ बॅचच्या विद्यार्थी-शिक्षकांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

नांद्रा, ता. पाचोरा (प्रतिनिधी : प्रा. यशवंत पवार)

निर्मलाताई अध्यापक विद्यालय, वरखेडी येथील सन २०११-१२ या शैक्षणिक वर्षातील डी.एड. विद्यार्थी-शिक्षकांचा स्नेहमेळावा (Get-Together) रविवारी (दि. १२ जुलै) पाचोरा येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सर्वात प्रथम संस्थेचे चेअरमन स्वर्गीय नानासाहेब शांताराम सोनजी पाटील यांच्या विनम्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थी-शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

या स्नेहमेळाव्यास तत्कालीन प्राध्यापक प्रा. यशवंत पवार, प्रा. लता परदेशी, प्रा. पौर्णिमा वाकोडे, प्रा. प्रशांत पाटील तसेच कार्यालयीन प्रतिनिधी सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी तत्कालीन विद्यार्थी-शिक्षक दिनेश छल्लारे, कपिल चव्हाण, गणेश सोनवणे, साधना पाटील, सीमा लोहार, प्रियंका पाटील, दिपाली पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत असलेले अनेक माजी विद्यार्थी-शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन साधना पाटील यांनी केले. उपस्थितांनी आपल्या मनोगतात डी.एड. शिक्षणकाळातील अविस्मरणीय आठवणींना उजाळा दिला. आज विविध शासकीय, निमशासकीय, खासगी सेवा, उद्योग-व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रात यशस्वी वाटचाल करताना विद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन, शिस्त, संस्कार आणि अध्यापनाची प्रेरणा हीच आपल्या यशाची खरी गुरुकिल्ली ठरल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.

हा स्नेहमेळावा केवळ भेटीगाठींचा कार्यक्रम न राहता, जुन्या मैत्रीचे बंध अधिक दृढ करणारा आणि गुरु-शिष्य नात्याला नव्याने उजाळा देणारा ठरला. यावेळी सर्वानुमते दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये सन २०११-१२ व २०१२-१३ या दोन्ही बॅचचा संयुक्त भव्य स्नेहमेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच अद्याप संपर्कात नसलेल्या विद्यार्थी-शिक्षकांचे मोबाईल क्रमांक मिळवून त्यांना व्हॉट्सॲप समूहात सहभागी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमानंतर सर्वांनी एकत्र सुरुची भोजनाचा आस्वाद घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला. आनंदी वातावरणात संपन्न झालेल्या या स्नेहमेळाव्याने गुरु-शिष्य नाते आणि सहाध्यायांमधील जिव्हाळा पुन्हा एकदा अधोरेखित केला.





















No comments